IMG-LOGO
नाशिक शहर

कृष्णभक्तीबरोबरच प्रज्ञावंत समाजसेवेचे प्रतीक संत मीराबाई

Sunday, May 26
IMG

सुरुवातीला स्व. स्मिता जाधव यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

नाशिक, दि. २६ :   सुंदर पद्न्यास, नेटके संगीत संयोजन आणि तितकाच प्रभावी नृत्य आविष्कार अशा त्रिवेणी संगमाद्वारे संत मीराबाई यांच्या जीवन चरीत्राचे काही दुर्मिळ पैलु प्रसिद्ध नृत्यांगना विद्या देशपांडे यांनी उलगडून दाखविले. संत मीराबाई भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असण्याबरोबरच त्या एक प्रज्ञावंत, परिवर्तनवादी अशा थोर समाज सेविका असल्याचेही त्यांनी या नाट्य प्रयोगातून अधोरेखित केले.वसंत व्याख्यानमालेत स्व. स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती कार्यक्रमात त्यांनी संत मीरा यांच्या 525 व्या जयंती वर्षानिमित्त नाट्य, नृत्य आणि संगीत आविष्काराने नटलेला 'मीरा' हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. सुरुवातीला स्व. स्मिता जाधव यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. विजय घाटगे, डॉ. विक्रांत जाधव व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संत मीराबाईच्या संतपदापर्यंतच्या जीवन प्रवासाचे श्रेय त्यांच्या आजोबांना जाते अशा निवेदनातून त्यांनी मीराचे बालपण, कृष्णभक्ती, बालसुलभ भावना, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि एकुणच जडणघडण आणि भक्तीचा प्रवास मांडला. आपल्या प्राणप्रिय संख्यांशी प्रेमाने भांडणारी, आजोबांची चिंता दूर करण्यासाठी थेट कृष्णाला साकडे घालणारी मीरा, पाऊस पडताच आनंद व्यक्त करणारी मीरा आणि त्याचवेळी आजोबांच्या मृत्युमुळे कासावीस झालेली आणि त्यानंतर पुन्हा कृष्ण भजनात तल्लीन होणारी मीरा, अशी विविध रूपे त्यांनी संगीत, संवाद आणि नृत्याभिनयाच्या माध्यमातून साकारली. दुसरीकडे या कृष्णप्रेमामुळे सामाजिक परिस्थितीवर होणारे परिणाम, राजपूताना प्रांतावर येवु घातलेली संकटंपाहता पुन्हा कृष्णआराधना करणारी मीरा, राणा सांगा यांच्याकडून आलेला पुत्रवधू बनण्याचा प्रस्ताव नाकारणारी आणि नंतर अनिच्छेने प्रस्ताव स्वीकारताना व्यक्त होणारी मीरा, सासुरवाडीस जाण्यापूर्वीच व्यक्त होणारी कृष्णभक्ती आणि त्यातुन पून्हा कृष्णाचीच आराधना, वैवाहिक जीवनातही केलेली कृष्णभक्ती आणि भोजराज यांच्या साथीने आयुष्यभर केलेली समाजसेवा हे सर्व भाव सादर करतानाच त्यातून मिरेच्या सेवावृत्तीचे दर्शन त्यांनी घडविले.  सौ. देशपांडे यांचीच संहिता असलेल्या या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन व संगीत संयोजन सुनिल देशपांडे यांनी केले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ए. एन. कराओके क्लब व नितीन चव्हाण प्रस्तुत 'साजन को मील गई सजनी' हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये श्री. चव्हाण यांच्यासह श्रीकांत जोशी, श्रियश देशपांडे, सुनिल कोचर, संजय गाडे, राजेश बागुल, सागर ऊगले, कल्पना पवार, मेधा सोनवणे यांनी विविध गिते सादर केली. अंजली चव्हाण यांनी निवेदन केले.

Share: