IMG-LOGO
राष्ट्रीय

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे चिन्ह घड्याळच; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

Tuesday, Oct 22
IMG

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली, दि. २२  : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून राज्यात निवडणूक तयारीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याप्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप येणं बाकी आहे. त्याआधीच विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती. हे प्रकरण सुनावणीसाठी न आल्याने शरद पवारांच्या पक्षाच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टासमोर मेन्शन केलं. मात्र यावेळी कोर्टाने घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार दिला आहे. घड्याळ म्हणजे शरद पवारांचा पक्ष हे जनतेपर्यंत पोहोचले असून याचा फटका शरद पवारांच्या पक्षाला बसू शकतो, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Share: