शरद पवार तीन दिवसांपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
नाशिक, दि. २० : लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बारामतीमधील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. आज त्यांच्या या दौऱ्याचा तिसरा दिवस असून या सर्व दुष्काळी भागाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी यावेळी मोठे विधान केले. 'केंद्रातील व राज्यातील सरकार आमच्या हातात नाही आहे. पण तुम्ही लोकसभा निवडणुकीला काम केले तसे विधानसभेच्या निवडणुकीला काम केले तर सत्ता कशी हातात येत नाही, हे मी पाहतोच'', असे विधान शरद पवार यांनी केले आहे.शरद पवार यांनी आरएसएसने घेतलेल्या बैठकीवरुनही महत्वाचे विधान केले. "महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा भाजप, मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांना विश्वासाला तडा बसला आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाल्या, मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास नाही," अशी टीका त्यांनी यावेळी केली. राज्यात सुरू असलेल्या ओबीसी- मराठा बांधवाच्या संघर्षावरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले. "केंद्र सरकारने यात पुढाकार घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करायला लागेल, केंद्राला बघ्याची भूमिका घेतली जाणार नाही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची जबाबदारी सगळ्यांची आहे," असे म्हणत या प्रश्नी केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. राज्य सरकार हातात आलं तर जनतेची दुखणी सोडायला वेळ लागणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. नेत्याने काही केले नाही, पण मी तुमच्या पाठिशी उभा राहणार आहे. आपण एका विचाराने राहुन या गोष्टी दुरूस्त करू असे शरद पवार यांनी विधान करत अजित पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.