IMG-LOGO
महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेच्या तुलनेत आपला स्ट्राईक रेट चांगला

Wednesday, Jun 19
IMG

शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे.

मुंबई, दि. १९  :  शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीच्या एनआयसी येथे शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?”, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उठाव केला तो खऱ्या अर्थाने या निवडणूकीत जनतेने शिक्कामोर्तब केलं. हा निर्णय कसा योग्य होता हे दाखवून दिलं. वारसा सांगणाऱ्यांना आज हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदूत्वाची अॅलर्जी आली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील संपूर्ण इंडिया आघाडी होती. आज वर्धापण दिनीही तमाम हिंदू बांधव म्हणण्याची त्यांना हिंमत नव्हती. बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागण्याचा त्यांना अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता केला. धनुष्यबाण पेलण्याची ताकत मनगटात लागते ती ताकद आपल्या धनु्ष्यबाणात आहे. म्हणून लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला. लोकसभेच्या सात जागा आपण जिंकलो, आपण आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. माझा आत्मविश्वास होता. पण आता मागचं सगळं विसरुन महायुती मजबूत करायची आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. तेरा जागा शिंदे गट आणि उबाठा समोरासमोर लढले त्यात सात जागा आपण जिंकलो. आपला स्ट्राईक रेट 47 टक्के आहे. तर त्यांचा स्ट्राईक रेट आहे 42 टक्के. त्यांना तेरा जागेवर 7 लाख मतं मिळाली. तर आपल्या तेरा उमेदवारांना 62 लाखं मतं मिळाली अशी आकडेवारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा खरी शिवसेना कोण हे हे स्पष्ट झालं आहे. खरी शिवसेना कोणाची हे जनतेने या निवडणुकीत दाखवून दिलं आहे, शिवसेनेचे मूळ मतदारांपैकी 19 टक्के मतं मिळाली तर चार टक्के मत त्यांच्याकडे राहिली. मग त्यांचे उमेदवार कसे निवडून आले हे सर्वांना माहित आहे. पण ठाकरेंची हा विजय तात्पूरती सूज आहे. पण सूज काही काळाने उतरते असा टोला शिंदे यांनी लगावला. 

Share: