IMG-LOGO
नाशिक शहर

जीवनाचा संघर्ष हीच 'उभारणी'ची कहाणी : प्रा. इंगळे

Monday, May 20
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ते 'उभारणी' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. २० :  जिथे सजीव आहे, तेथे संघर्ष आलाच. ढोरवाड्यात राहून हा संघर्ष आम्ही अगदी जवळुन बघितला आहे. किंबहुना त्यातूनच मी घडत गेलो. ही संपुर्ण कहाणी उभारणी या पुस्तकात मांडली आहे. असे प्रतिपादन मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भगवान इंगळे यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ते 'उभारणी' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. माधवराव लिमये यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. प्रा. अरविंद जोशी यांनी श्री. इंगळे यांचा, तर उषा तांबे आणि संगीता बाफणा यांनी आशाताई इंगळे यांचे स्वागत केले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. इंगळे यांनी वेळोवेळी दिलेल्या देणगीबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच दानशूरानी व्याख्यानमालेस असेच सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  सौ. इंगळे यांनीही मनोगत व्यक्त करून आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उखाणाही घेतला. प्रा. इंगळे  म्हणाले की, माझ्या ढोर या पुस्तकात आयुष्यातील अनेक अनुभव मांडले आहेत. त्यापैकीच काही अनुभव सांगत माझी वाटचाल आपण सांगणार असून ही संपूर्ण वाटचाल 'उभारणी' या पुस्तकात असल्याचे त्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी खर्डे गावची पार्श्वभूमी, आठ भावंडे असलेले कुटुंब, गावातील अठरा पगड जातींचे वास्तव्य, त्यातही राजपूत समाजाची स्थिती आदींचा उल्लेख त्यांनी केला. जनावरांचे चामडे वाहने हा आमचा पिढीजात धंदा असल्याने जीवनाचा खरा संघर्ष बालपणापासूनच अनुभवला. ढोरवाड्यात प्रचंड दुर्गंधीमुळे जनावरसुद्धा येत नसत. मात्र माझा स्वभाव, चिकाटी आणि मदतीच्या भावनेमुळे गावातील उच्च वर्णीय विद्यार्थीसुद्धा अभ्यासाला येऊ लागले. या प्रवासात बहीण पद्मिनबाईचे अनंत उपकार आहेत. असे विविध अनुभव त्यांनी सांगितले. याच अनुभवाचा पुढील आयुष्यात खुप फायदा झाला. महावीद्यालयीन शिक्षणानंतर रयत संस्थेत नोकरीस लागलो. या दरम्यानच्या अनेक गमतीजमतीही त्यांनी यावेळी सांगितल्या. तसेच 1972 च्या  दुष्काळाची परिस्थिती, ढोरवाड्यातील जीवन, शिक्षणासाठी केलेला संघर्ष, वाचनाची भुक भागवण्यासाठी केलेला आटापिटा, पद्मिनबाईच्या मुलाचा अकाली मृत्यू, विविध जाती-पातीच्या मुलांचा केलेला सांभाळ, या प्रवासात लाभलेले गूरूजण आदींबाबतचे हृदयस्पर्शी प्रसंग मांडत हे सारेकाही ढोर, उभारणी या पुस्तकांचे विषय झाल्याचेही त्यांनी सांगितले. या संपुर्ण प्रवासामुळे माझी प्रसिद्धीही होत असे आणि त्यामुळे जबाबदारीही वाढत गेली. त्यातुन खुप काही शिकायला मिळाले आणि त्यातूनच आपण घडत गेल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लीना बोरा प्रस्तुत 'यादगार रफी' हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये राजेश बोरा, मयूर टुकडिया यांनी गाणी सादर केले. टी.व्ही. स्टार श्रीपाद कोतवाल यांनी निवेदन केले. अमोल पालेकर व जयेश भालेराव यांनी संगीत संयोजन केले.

Share: