भारतीय कर्णधार आता जिंकलेल्या ५० टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार बनला आहे.
बारबोडस, दि. ३० : शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. संथ खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्ये ३ बाद ३४ धावा अशी परिस्थिती असताना भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आणि टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली. या इनिंगमध्ये विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. भारताने शनिवारी (२९ जून) बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ जिंकत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. यासह कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. तसेच विराट कोहलीने फायनलमध्ये सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर निवृत्ती घेतली. कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२००७ आणि २०११) नंतर – ३७ वर्षीय रोहित शर्मा हा टी-२० विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. भारतीय कर्णधार आता जिंकलेल्या ५० टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार बनला आहे.