पावसाचं सावट असल्यामुळे हा सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला.
जॉर्जटाऊन, दि. २८ : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या विजयासह भारताने १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.पावसाचं सावट असल्यामुळे हा सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. नाणेफेकीचा कौल इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या बाजूने लागला. ज्यानंतर त्याने लगेचच बॉलिंगचा निर्णय घेतला. ज्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पावसाचं सावट असल्यामुळे हा सामना रद्द झाला असता तर भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता.कर्णधार रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता शनिवारी संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. रोहितने यादरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाल्यानंतर अखेरीस आदिल रशिदने रोहितला बाद केलं. रोहितने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावत ५७ धावा केल्या. यानंतर भारतीय डावाला काहीशी घसरण लागलेली पहायला मिळाली. सूर्यकुमार यादवही फटकेबाजीच्या नादात ४७ धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक, रविंद्र आणि अक्षर पटेल यांनी अखेरच्या फळीत दिलेल्या योगदानांमुळे भारताने निर्धारित षटकांत ७ विकेट गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने ३ विकेट घेतल्या. त्याला टोपले, आर्चर, करन, आदिल रशिद यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.