योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले असून योजना बंद होणारे नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई, दि. २० : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यामुळे आता सरकारी कामांवर याचा काहीसा प्रभाव पडेल. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या काही सरकारी आर्थिक योजना बंद करण्यात याव्यात, अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिली आहे. या सूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून निवडणुका पार पडेपर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे त्यासाठी पात्र असलेल्या महिलांना मिळणार नाही. आता थेट योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले असून योजना बंद होणारे नसल्याचे स्पष्ट केले आहे. आदिती तटकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची अंमलबजावणी जुलै २०२४पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै,ऑगस्ट,आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!’ अशी पोस्ट शेअर केली आहे.