IMG-LOGO
नाशिक शहर

महाराष्ट्राचे आजचे चित्र आचार्य अत्रे यांनी मान्यच केले नसते : कांगो

Wednesday, May 15
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. द. गें. खैरनार (गुरुजी) स्मृती व्याख्यानात ते 'आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. १५   : आचार्य अत्रे असते तर त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आकाश पाताळ एक केले असते. संघ राज्यीय व्यवस्थेत अस्मितेला असणारे महत्त्व त्यानी अधोरेखित केला असता. पण आज या उलट परिस्थिती असून ही व्यवस्थाच लयास जाते की काय अशी भीती व्यक्त व्हायला लागली आहे. असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र कांगो यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. द. गें. खैरनार (गुरुजी) स्मृती व्याख्यानात ते 'आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. द. गें. खैरनार (गुरुजी) यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंतराव खैरनार, माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. मूक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी परिचय करून दिला. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.श्री. कांगो म्हणाले की, हाऊस फुल हा शब्द अत्रे यांच्या नाटकांमुळे मराठीला मिळाला. बेळगाव महाराष्ट्रात सामील न झाल्याने महाराष्ट्राचे स्वप्न अजूनही अर्धवट आहे. संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा अजूनही न्यायालयात सुरूच आहे. आचार्य अत्रे यांच्यासारखा नेता दहा हजार वर्षांत झाला नाही आणि होणारही नाही. त्या काळातील सर्वच नेते विज्ञाननिष्ठ होते. तरीही अत्रे यांचे पाय मातीतच होते. ते आयुष्यभर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले. मराठी बाणा आणि स्वाभिमान त्यांना नेहमीच प्रिय होता. तरुण पिढीला इतिहास आणि अत्रेही माहीत नाहीत. हे स्वतः अत्रे यांनाही अपेक्षित नव्हते, याचा विचार व्हायला हवा.   लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवू नये असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे धर्म आणि राजकारणात आज जे काही चालले आहे, ते त्यांना मुळीच आवडले नसते. कार्ल मार्क्सने धर्माला आफुची गोळी का म्हटले होते याचा आपण विचार करायला हवा. देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्र करेल असे ते म्हणायचे. आज तसे होताना दिसत नसेल तर याचा अर्थ त्यांचे स्वप्न आजही पुर्ण झालेले नाही. चित्रपट, नाटक आदी कला, देशभर सुरू असलेला दोन विचार प्रवृत्तीचा संघर्ष, वैज्ञानिक व विवेकवादी  दृष्टिकोन यासारख्या विषयांवरिल त्यांचे विचार श्री. कांगो यांनी उदाहरणांसह मांडले. त्याचवेळी हे विचार आज आमलात येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच वृत्तपत्रांच्या आजच्या परिस्थितीला धारेवर धरण्यासाठीही त्यांनी लेखणी हाती घेतली असती. अत्रे यांची परखड पत्रकारिता, नेहरू- गांधींबाबत त्यांनी लिहिलेले लेख हेच सिद्ध करतात की त्यांचे समर्थन जरी केले असले, तरी ते अंधभक्त नव्हते. ज्यांना खायलाही मिळत नाही, असे राष्ट्र युद्ध करत आहेत आणि त्यात हळूहळू भारतालाही ओढले जात आहे. हे अत्यंत घातक आहे. त्यामुळेही आजच्या निवडणुकीच्या वातावरणात विविध विषयांवर अत्रे यांची लेखणी तळपली असती. येणाऱ्या काळातील संभाव्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मराठा-ओबीसी वादावरही अत्रे यांनी ताशेरे ओढले असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संजय अडावदकर प्रस्तुत सेंटिमेंटल मुड्स ऑफ मो. रफी हा गाण्यांचा कार्यक्रम झाला.

Share: