राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरअसून त्यांनी मराठ्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
बीड, दि. १० : उद्धव ठाकरे व शरद पवार मनोज जरांगे यांच्या आडून राजकरण करत आहेत. माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला एकही सभा घेऊ देणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला आहे. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरअसून त्यांनी मराठ्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत, माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे व शरद पवारांना देत मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही, या भूमिकेचा पुनरूच्चारही राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्या विरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. राज ठाकरे म्हणाले, माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाल्यानंतर मी मनोज जरांगे पाटलांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्या या लोकांचे शरद पवारांसोबत फोटो आहेत. शुक्रवारी बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार व उद्धव ठाकरे विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा पण माझ्या नादी लागू नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत.तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग असेल तर त्यांच्यावर टीका करा पण त्यासाठी समाजात कशाला भांडणं लावण्याचा प्रयत्न करता? शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं म्हणतो. मतांसाठी या लोकांकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.