उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वागळे इस्टेट येथील विभाग प्रमुख प्रितेश राणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. या हल्ल्यामागे ठाकरे गटातील पदाधिकारी सामील असल्याचा दावा करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत माझ्या नादू लागू नका, असा इशारा दिला. यानंतर काहीच तासांत ठाण्यातील सभेसाठी जात असताना उद्धव ठाकरेंचा ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ, बांगड्या आणि शेण फेकले. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. कोल्हापुरात शिवसैनिकांनी मनसे शाखा फलकांना काळे फासत तोडफोड केल्याची घटना समोर आली. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वागळे इस्टेट येथील विभाग प्रमुख प्रितेश राणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, अविनाश जाधव, प्रितेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलु, मनोज चव्हाण, यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी म्हटले की, ‘तुम्ही आमच्या राज साहेबांच्या ताफ्यावर सुपारी फेकून मारल्या. त्यामुळे आम्ही उत्तर दिले. तुम्ही सुपारी फेकली तर आम्ही नारळ फेकू. यापुढे राज ठाकरे यांच्याविरोधात काही बोलल्यास घरात घुसून मारू, असेही त्यांनी म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. उद्धव ठाकरें यांची ठाण्यातील गडकरी गडकरी रंगायतन सभागृहात सभा पार पडली. मात्र, यापूर्वी मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा समोर येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकले. यानंतर मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. ठाण्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे. यातच कोल्हापुरात संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेचे शाखा काळ फासून तोडफोड केली.