IMG-LOGO
राष्ट्रीय

UGC NET परीक्षेत अनियमिततेचा संशय ; शिक्षण मंत्रालयाकडून २४ तासातच परीक्षा रद्द

Wednesday, Jun 19
IMG

शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

दिल्ली, दि. १९  :  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने (यूजीसी)  राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात यूजीसी नेट परीक्षा घेण्यात येते. पीएचडी प्रवेश, ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच JRF आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी  देशभरातील विद्यापीठांमध्ये UGC NET परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा मंगळवारी  (दि. १८) घेण्यात आली होती. ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे. नव्याने घेतली जाणारी ही परीक्षा नेमकी कधी होईल, यासंदर्भात लवकर निर्णय जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. याबरोबरच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असंही शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. याप्रकरणात जी कुणी व्यक्ती दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.याआधी NEET परीक्षेच्या ग्रेस गुणांवरून झालेल्या गोंधळ पूर्णपणे मिटवण्यात आला आहे. तसेच पाटणा येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या अनियमिततेबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. यावर्षी तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत. तर बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचंही समोर आल्याने घोटाळ्याच्या शंकेला मोठा वाव मिळतोय. 2250 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण आहेत. संबंधित अहवाल मिळाल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

Share: