वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली.
नवी दिल्ली, दि. १५ : भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलंच भाषण असल्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या ध्येयधोरणांनुसार कामकाज होईल यावर मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच, वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली. बांगलादेशातील परिस्थितीवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य करताना तेथील वातावरण लवकरात लवकर पूर्वपदावर यावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर कोलकात्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच समाज म्हणून आपल्याला त्याबाबत जागृत होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशात घराणेशाही, जातीवाद भारताच्या लोकशाहीचं मोठं नुकसान करत आहे. देशाला, राजकारणाला आपल्याला घराणेशाही व जातीवादापासून मुक्ती द्यावी लागेल. आपलं एक ध्येय हेही आहे की आपण लवकरात लवकर राजकीय दृष्ट्या १ लाख अशा तरुणांना पुढे आणू इच्छितो, ज्यांच्या कुटुंबात कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी असणार नाही. अशा होतकरू तरुणांनी राजकरणात यावं जेणेकरून जातीवाद, घराणेशाहीपासून मुक्ती मिळावी. त्यांना हव्या त्या पक्षात त्यांनी जावं. तिथून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पुढे यावं. असे ते म्हणाले.