नाशिक जिल्ह्यात एकूण ४९१९ मतदान केंद्र असून सात सहायकारी मतदान केंद्र आहेत.
नाशिक, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघ असून तेथे २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होऊन २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात ५० लाख २८ हजार ७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेत निवडणूक तयारीची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (प्रशासन) आदी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघजिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात एकूण 15 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात 113- नांदगाव, 114- मालेगाव मध्य, 115- मालेगाव बाह्य, 116- बागलाण (अ. ज.), 117- कळवण (अ. ज.), 118- चांदवड, 119- येवला, 120- सिन्नर, 121- निफाड, 122- दिंडोरी (अ. ज.), 123- नाशिक पूर्व, 124- नाशिक मध्य, 125- नाशिक पश्चिम, 126- देवळाली (अ. जा.), 127- इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यात 25 लाख 99 हजार 839 पुरुष, 24 लाख 28 हजार 113 महिला, 120 तृतीयपंथी, 8 हजार 811 सैनिक मतदार असे एकूण 50 लाख 28 हजार 072 मतदार आहेत. निवडणूक कार्यक्रम असानिवडणुकीचा कार्यक्रम असा : नामनिर्देशन पत्र दाखल करणे- मंगळवार २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२४, वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी- बुधवार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून संबंधित निवडणूक अधिकारी यांच्य कार्यालयात, उमेदवारी अर्ज मागे घेणे- ४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, मतदानाचा दिनांक व वेळ- २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल, तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ असा आहे.नाशिक जिल्ह्यात ४९२६ मतदान केंद्रेनाशिक जिल्ह्यात एकूण ४९१९ मतदान केंद्र असून सात सहायकारी मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, एक शिपाई कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २७ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा एकूण ४० लाख रुपये असून उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर करावयाचा आहे. या खर्चासाठी उमेदवारांनी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय फिरती पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हीडिओ सर्वेक्षण पथके, व्हीडिओ देखरेख पथके गठित करण्यात आली आहेत. फिरत्या पथकांना दंडाधिकारीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.मुख्य निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीनिवडणुकीचा प्रचार करताना विना परवाना खासगी व सार्वजनिक जागेवर/मालमत्तेवर पोस्टर लावणे, निवडणूक चिन्हे लिहून इतर कारणाने मालमत्ता विद्रुप करण्यावर बंदी आहे. दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन प्रॉपर्टी ॲक्ट अन्वये संबधित कारवाईस पात्र राहील. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मा. मुख्य निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. उमेदवारांच्या खर्च विषयक बाबी तपासण्यासाठी निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, भरारी पथके, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी, लेखा पथके, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती, डीईएमसी यांची पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिकांना C- VIGIL ॲपद्वारे निवडणूक संदर्भात आक्षेपार्ह छायाचित्र, व्हीडिओ या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदविता येईल. अशा तक्रारींवर भरारी पथक १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करून तक्रार निकाली काढेल. सुविधा ॲपद्वारे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि विविध परवानगी मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजनामतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सोयीसुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येतील. ‘स्वीप’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ८५ वर्षांवरील मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा असेल. बीएलओंच्या माध्यमातून मतदार चिठ्ठी व मार्गदर्शिका मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.