अजित पवार यांनी ट्वीट करत भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
मुंबई, दि. १२ : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. यावर अजित पवार यांनी ट्वीट करत भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध केला आहे. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.