स्थानकाबाहेरही आंदोलकांना दगडफेक केली. पोलिसांच्या एका गाडीचीही तोडफोड केली.
बदलापूर, दि. २० : बदलापुरातील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरकरांनी या घटनेच्या निषेधार्थ शहर बंदची हाक दिली होती. आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सकाळपासून आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केला होता. यामुळे मध्य रेल्वेची अंबरनाथ ते कर्जत पर्यंतची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. तब्बल 10 तासानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवण्यात आलं. मात्र पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बदलापूरकरांच्या रेल रोकोमुळे 12 मेल एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला होता. कोयना एक्स्प्रेसचा देखाल मार्ग बदलून दिवा-पनवेल असा करण्यात आला. अंबरनाथ-कर्जत दरम्यान जवळपास 30 लोकलची वाहतूक रद्द करण्यात आली होती. आंदोलनकांना पांगवताना झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. पोलीस कर्मचारी कुंडलिक उगले आणि शशिकांत लावंड जखमी असल्याची माहिती आहे. बदलापूर स्थानकाबाहेरही आंदोलकांना दगडफेक केली. पोलिसांच्या एका गाडीचीही तोडफोड केली.