यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार…ते आज खरं झालं आहे.
मुंबई, दि. ७ : ‘बिग बॉस मराठी ५’ला अखेर त्यांचा विजेता मिळाला आहे. अतिशय खडतर प्रवास करून इथवर आलेल्या सूरज चव्हाणने प्रेक्षकांच्या मनासोबतच ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. ‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने विजेत पद पटकावत सगळ्यांनाच एक वेगळा सूरज दाखवला आहे. त्याला ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीसोबतच रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. यासोबतचा त्याला केदार शिंदे यांच्या आगामी सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली आहे.सूरज चव्हाणने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचं मन जिंकत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सूरज घरात नेहमी ‘आपला पॅटर्न वेगळाय, ही ट्रॉफी मी जिंकणार, मला माझ्या चाहत्यांवर पूर्ण विश्वास आहे’ असं म्हणायचा. अखेर त्याचे हे शब्द खरे ठरले आहेत. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत अशा तगड्या स्पर्धकांना टॉप-३ मध्ये टक्कर देत सूरजने हे विजेतेपद पटकावलं आहे. सूरजने असंख्य अडचणींवर मात करत यशाचा हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. त्याच्या आई-बाबांचं लहानपणीचं निधन झाल्याने सूरजला शिक्षण घेता आलं नाही. मोठ्या बहिणीने याचा सांभाळ केला. ‘बिग बॉस’च्या घरात पॅडी आणि अंकिता त्याला सगळे टास्क समजावून सांगायचे. पंढरीनाथ आणि सूरजच्या सुंदर मैत्रीची तर सीझनभर प्रचंड चर्चा झाली. विजयी झाल्यावर सूरज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. त्या घराला म्हणजेच घर बांधून झाल्यावर मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे.” “मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार…ते आज खरं झालं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!”