IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

शिरूरची जागा लढविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा फोन; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Thursday, Apr 25
IMG

मुळात मी कशाला शिरूरला जाईन मी त्यांना सांगितलं की मी नाशिक सोडून कुठेही जाणार नाही.

नाशिक, दि. २५ : शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र तो प्लॅन नंतर रद्द झाला. अमोल कोल्हे यांच्या या दाव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अगदी चांगला विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला. ते मला म्हणाले शिरूरमध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तुम्ही तिथून निवडणूक लढू शकता. यामागे त्यांचा खूप चांगला हेतू होता. मी तिथे गेलो असतो तर नाशिकचा तिढा देखील सुटला असता आणि हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका होती, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, मुळात मी कशाला शिरूरला जाईन?  मी त्यांना सांगितलं की मी नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. मुळात मी काही त्यांना मागितलंच नव्हतं. मला नाशिकमधून उमेदवारी मिळाली नाही तर कुठल्याही मतदारसंघातून उमेदवारी द्याच असा काही माझा आग्रह नव्हता. मला तिकीट हवच आणि तिकिटासाठी मी कुठेही जाईन असं मी कुठेही म्हटलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांची अडचण झाली होती, कारण नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे खासदार आहेत, ती शिंदे गटाची जागा आहे. आमचाही त्या जागेसाठी आग्रह होता. त्यामुळे नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता. असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान  महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. अजूनही नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. आता पंकजा मुंडे यांनी थेट नाशिकमधून प्रीतम मुंडेंना निवडणुकीसाठी उतरविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.

Share: