आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर, दि.३ : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी येथून उघडकीस आली. या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणातील आरोपीला काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.