स्थलांतरितांनाही मतदानात सहभागी होता येईल, असे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नवी दिल्ली, दि. १६ : संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली. १८ व २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांमध्ये अनुक्रमे २४, २६ आणि ४० जागांवर मतदान होईल. ९० जागांपैकी ७४ जागा खुल्या प्रवर्गात तर सात जागा अनुसूचित जातींसाठी व नऊ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ८७.०९ लाख मतदार असून ३.७ लाख पहिल्यांदाच मतदान करतील. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही स्थलांतरितांनाही मतदानात सहभागी होता येईल, असे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.