मोटारीची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या नावाने आहे.
नागपूर, दि. १० : एका ऑडी मोटारीने रविवारी मध्यरात्री शहरात पाच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या मोटारीची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या नावाने आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत यांची मोटार त्यांचा चालक अर्जुन हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) यांना चालवायला दिली होती. याच मोटारीने रविवारी मध्यरात्री पाच वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त जितेंद्र सोनकांबळे (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली. पोलिसांनी मोटार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. त्यावेळी तिची ‘नंबर प्लेट’ काढण्यात आल्याचे उघड झाले.