मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली जाहीर प्रचारसभा कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे पार पडली.
कुर्ला, दि. ३ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण तापलं आहे. आता सर्वच पक्षांकडून प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली जाहीर प्रचारसभा कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. तसेच २३ नोव्हेंबर रोजी राज्यात बॉम्ब फुटणार आहे, असं म्हणत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री शिंदे यांनी इशारा दिला. तसेच लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार असून लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.