साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणे यांनी म्हटलं आहे.
दिल्ली, दि. १० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपाविरोधातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणे यांनी म्हटलं आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. तर भाजपाने राज्यात २८ जागा लढवून त्यापैकी त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या. आम्ही १५ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा होती की शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळेल. तसेच शिवसेना हा भाजपाचा अतिशय जुना साथीदार आहे त्यामुळे भाजपाने शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, अशी आमची पेक्षा होती. भाजपाने पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं आणि आम्हाला एक राज्यमंत्रिपद दिलं. त्यामुळे कुठेतरी आमच्याबरोबर दुजाभाव होतोय असं दिसतंय. श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना एनडीएने न्यायिक भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी अजित पवारांच्या पक्षालाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यायला हवं होतं. ही आमच्यासह महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती. अजित पवार यांनी मधल्या काळात आपल्या कुटुंबाशी वाईटपणा घेतला. ही गोष्ट आपण नाकारून चालणार नाही. तसेच ते भाजपा आणि एनडीएचे घटक पक्ष म्हणून काम करत आहेत. त्यामुळे अजित पवारांना न्याय मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूला, भाजपाने कोणाला मंत्री करावं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही राज्यातील जनतेची भूमिका आहे. उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत आणि ते वरिष्ठ देखील आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान मिळाला असता तर राज्यातील जनतेला अभिमान वाटला असता.