या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे.
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतल २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “महायुतीचे सरकार घाबरले आहे. महायुती पाहिजे त्या घोषणा करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे आता ते (महायुती) एका टप्प्यात पराभूत होतील”, असा इशाराच जयंत पाटील यांनी महायुतीला दिला. दरम्यान, जयंत पाटील यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेवरूनही महायुतीवर निशाणा साधला. तसेच आम्ही लाडकी बहीण योजनेला कोणताही विरोध केलेला नाही. उलट आम्ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीने दिलेल्या लाभापेक्षा जास्त फायदा लाडक्या बहिणींचा कसा होईल, यासाठी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर उपाययोजना करण्याचं काम करणार आहोत, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.