IMG-LOGO
नाशिक शहर

लोक बिरादरी प्रकल्पामुळे आमच्यासह अनेकांचे जीवन बदलले : आमटे

Monday, May 06
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. शांताराम पाटील (गडाख) स्मृती व्याख्यानात ते 'लोक बिरादरी प्रकल्पाचा प्रवास' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. ६ : हेमलकसाच्या झोपडीतून सुरू झालेले आमचे जीवन लोक बिरादरीच्या निमित्ताने संपुर्ण जगाला कवेत घेऊन समृध्द झाले. यामागे वडिलांची प्रेरणा आणि आदिवासींप्रती सेवाभाव हेच प्रमुख तत्व आहे. या तत्वांना कार्यकर्त्यांची मोठी साथ लाभली. तद्वतच संयम, प्रामाणिकपणा आणि वेळोवेळी केलेल्या प्रयोगांमुळे मार्ग सापडत गेले. या प्रकल्पाने आमचे आयुष्य बदलुन गेले. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध  समाजसेवक व लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रमुख प्रकाश आमटे यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. शांताराम पाटील (गडाख) स्मृती व्याख्यानात ते 'लोक बिरादरी प्रकल्पाचा प्रवास' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. शांताराम पाटील (गडाख) यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. किरण सोनार यांनी आमटे दांपत्याचा परिचय करून दिला. मनीष सानप यांनी स्वागत केले. जयवंत पाटील, अनिल चौधरी (सौंदाणकर), सुनील सौंदाणकर, मुकुंद दिक्षित व्यासपीठावर उपस्थित होते. प्रणव सातभाई या चीत्रकाराने रेखाटलेले चित्र श्री व सौ आमटे यांना भेट दिले. श्री. आमटे म्हणाले की, ज्या आदिवासी बांधवांना स्वातंत्र्यानंतरही मुलभूत सुविधा मिळत नाहीत, त्यांच्यासाठी काम करण्याचे शिवधनुष्य बाबांनी आमच्याकडे सोपवले. त्यावेळी आम्ही डॉक्टर झालेले होतो. हे टास्क आम्ही आनंदाने स्वीकारले. बाबा पुरोगामी विचारांचे होते. कर्माकाण्डापेक्षा कार्यावर त्यांचा अधिक विश्वास होता. आपल्या विवाहाच्या प्रसंगाचे वर्णन करतानाच त्यांनी बाबा आमटे यांच्या जीवनातील काही घटनांचा उल्लेख करत लोक बिरादरी प्रकल्पाची वाटचाल मांडली. बाबांची धाडसी वृत्ती, कुष्ठरोग्याबाबतची कणव, भीती आणि त्यातून अवघ्या सहा रोग्यापासून सेवा सुरू केली. त्यातुनच आनंदवन आकारास आले. याच आनंदवनात आमचे शिक्षण झाले. अकरावी मट्रिकमध्ये असताना आम्हा दोन्ही भावांना बाबांच्या कार्याची महती पटली. यासारखे विविध प्रसंग त्यांनी यावेळी विशद केले. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे सुरुवातीला अनंत अडचणी आल्या. लोकांचा विश्वास संपादन करणे, त्यांची भाषा आत्मसात करणे, खाण्या-पीण्याचे हाल यासारख्या अडचणींतून मार्ग काढले. या कामाची माऊथ टु माऊथ जाहिरात झाली आणि या संपुर्ण प्रयत्नांतून हा प्रकल्प आकारास आल्याचे त्यांनी सांगितले.सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाण्यांच्या कार्यक्रमात आज स्वरांजली व नादब्रह्म प्रस्तुत 'गोल्डन ड्युएटस' हा सुमधुर व सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्षा संगीता बाफणा, चिटणीस हेमंत देवरे यांच्यासह  पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share: