IMG-LOGO
राष्ट्रीय

ओटीटी प्लॅटफॉर्मवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज : सरसंघचालक मोहन भागवत

Saturday, Oct 12
IMG

दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परंपरागत विजयादशमी मेळावा नागपूरमध्ये पार पडला.

नागपूर, दि. १२  :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे काही बीभत्स दाखवलं जातं, त्याच्याबद्दल सांगणंही अभद्रपणाचं आहे,’ अशी सांगतानाच, ‘या सगळ्यावर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केली. दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परंपरागत विजयादशमी मेळावा नागपूरमध्ये पार पडला. या मेळाव्याला मोहन भागवत यांनी संबोधित केलं. राजकीय, सामाजिक बाबींचा उहापोह करताना भागवत यांनी यावेळी माध्यमांमधील कंटेंटवरही भाष्य केलं. समाजातील मोठे किंवा प्रमुख लोकांचं अनुकरण केलं जातं. मोठे लोक जसं वागतात, चालतात त्याचप्रमाणे इतर लोक चालतात. ते विचार करायच्या भानगडीत पडत नाहीत. प्रभावी लोक जे सांगतात, तसंच इतर लोक करतात. अशा वेळी मोठ्या लोकांची जबाबदारी वाढते. माध्यमांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. आपल्याकडून सामाजिक सभ्यतेला धक्का लागेल असं काही त्यांच्याकडून होणं अपेक्षित नाही, असं भागवत म्हणाले. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्माविषयी विचार मांडले. “स्व काय आहे? आपण कोण आहोत? कुठून आलो? कुठे जायचंय? या आधारावर आपल्या पूर्वजांनी एक सत्य प्राप्त केलं. त्या सत्याच्या आधारावर आपली काही मूल्य तयार झाली. ज्याला धर्म म्हणतात. सत्य, करुणा, शुचिता, तपस या चौकटीत जो बसतो, तो धर्म आहे. धर्म भारताचा स्व आहे. प्रचलित धर्म नाही. असे धर्म अनेक आहेत. सर्व धर्मांच्या मागे जो धर्म आहे, त्यामागची जी अध्यात्मिकता आहे, सर्व धर्मांच्या वरचा जो धर्म आहे, तो धर्म भारताचा प्राण आहे. ती आपली प्रेरणा आहे. त्यातून आपल्या इतिहासाची जडणघडण झाली आहे. त्यासाठी आपले बलिदान झाले आहेत”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

Share: