योग्य रस्त्याने जाण्याची मानसिकता कुणाची असेल तर त्यांचं स्वागत आहे.
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार परतण्यावर व राज ठाकरे यांच्या भूमिकेवर भाष्य केले. “राज ठाकरे असं बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वेळीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती. पण दुर्दैवाने लोकांनी राज ठाकरेंसारखी भूमिका घेतली नाही. लोकांनी त्यांना एकच जागा दिली”, असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राजू पाटील हे एकमेव उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे.दरम्यान, यावेळी शरद पवारांनी अजित पवारांवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार व इतर ४० आमदारांनी सत्ताधारी भाजपा व शिंदे गटासोबत युती केली होती. मात्र, त्यातील काहीजण स्वगृही परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “अनेक लोकांना असं वाटतंय की एकत्रित काम करावं. आपला रस्ता चुकला. योग्य रस्त्याने जावं. योग्य रस्त्याने जाण्याची मानसिकता कुणाची असेल तर त्यांचं स्वागत आहे”, असं शरद पवार म्हणाले.