७ महिने आधी कोतवाली पोलिस ठाणे क्षेत्रात नाल्याचे निर्माण करण्यावरून विनोद मिश्रा आणि स्थानिक लोकांमध्ये वाद सुरू होता.
सिंगरौली, दि. १६ : मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातील एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात केबिनमध्ये नगरसेविकेचा पती एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला धमकी देत होते. त्यांनी पोलिस अधिकाऱ्याची वर्दी उतरवण्याची धमकी दिली होती. यामुळे राग अनावर झाल्याने एएसआयने स्वत:च वर्दी काढली व छाती फुगवून त्यांच्यासमोर उभा राहिला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सात महिने आधीचा आहे, मात्र आता व्हायरल होत आहे, यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.७ महिने आधी कोतवाली पोलिस ठाणे क्षेत्रात नाल्याचे निर्माण करण्यावरून विनोद मिश्रा आणि स्थानिक लोकांमध्ये वाद सुरू होता. वाद वाढल्यानंतर महापालिकाचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वजण पोलीस ठाण्यात पोहोचले. या वादावर चर्चा सुरू होती. दरम्यान भाजप नेते व नगरसेविकेचा पती अर्जुन गुप्ता यांनी विनोद मिश्रा यांनी धमकी देत म्हणले की, मी तुझी वर्दी उतरवीन, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याचा संयम सुटला व त्यांनी स्वत:च आपली वर्दी काढली. ही घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर पोलीस अधिक्षिका निवेदिता गुप्ता यांनी विनोद मिश्रा यांच्यावर वर्दी फाडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. मात्र हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत असल्याने प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.