मग आम्ही बहिणी परवडल्या. आम्ही भावांनी दिलेल्या प्रेमावर खूश असतो.
मुंबई, दि. १३ : आगामी विधानसभा निवडणुकीत मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी सोमवारी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. या विधानावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते आहे. दरम्यान, यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना सुनावले आहे. “बहीण माहेर सोडून जेव्हा सासरी जाते, तेव्हा आमच्या बहिणीला नीट सांभाळा, असं सांगणारा भाऊच असतो. मात्र, तोच भाऊ आज मत दिलं नाही तर पैसे परत घेण्याची धमकी देतो. मग आम्ही बहिणी परवडल्या. आम्ही भावांनी दिलेल्या प्रेमावर खूश असतो. आता १५०० रुपये परत घेणाऱ्या भावाला मला खूप आदराने सांगायचं आहे. महाराष्ट्रातील लेकीला १५०० रुपये परत घेईल अशी धमकी जर दिली ना तर तू पैसे परत घेऊनच दाखव, मग बघते तुझा काय कार्यक्रम करते”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना दिला.“सत्तेत असलेल्या भावांची भाषणं आपण ऐकले तर त्यांना वाटतं की आजकालची नाती काय अशीच पळतात. पंधराशे रुपये दिले की नवीन बहीणी. पण पंधराशे रुपये दिले म्हणून या राज्यातील महिला त्यांना पाठिंबा देतील असं होणार नाही. या राज्यातील महिला या स्वाभिमानी आहेत. आम्ही महिला कष्ट करू, स्वत:च्या पायांवर उभं राहू आणि आमच्या भावांना साथ देऊ. आम्ही आमच्या भावांना कधीही रस्त्यावर सोडणार नाहीत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.