पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने अक्षयचा मृत्यू झाला.
बदलापूर, दि. २३ : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या केली नसून त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर केले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने अक्षयचा मृत्यू झाला. मात्र,या घटनेवर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठी शंका व्यक्त करत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.बदलापूरची घटना ज्या शाळेत घडली, त्या शाळेशी संबंध असणारा आपटे फरार आहे. त्याला अजून अटक झाली नाही. शाळेशी संबंधित अन्य कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र यात अक्षयला गोवलं जात असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अशा परिस्थितीत त्याने गोळी मारून घेतली की अजून काही झालंय? की त्याला कोणी नाईलाजाने गोळी मारली की यातून अजून काही प्रकरण आहे, याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा बनाव केल्याचे दिसत आहे. यावर विश्वास बसत नाही. दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? असा सवालही अंधारे यांनी केला आहे. प्रकरण हाताळता आलं नसलं की, एन्काउंटर केले जात असल्याचा आरोप गृहमंत्र्यांवर केला. हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी हा प्रकार झाला आहे का? अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर काय लपवण्याचा प्रयत्न झाला? या प्रकरणातील पोलिस निलंबित झाले पाहिजेत. संबंधितांची सीबीआय चौकशी करून नार्को टेस्ट झाली पाहिजे. या प्रकरणात पहिल्यापासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.