आपला आनंद हरपला आहे,अशी टीका केदार दिघे यांनी केली आहे.
ठाणे, दि. १४ : ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात लोकांनी नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत या प्रकारावर टीका केली आहे. केदार दिघे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला,असं ट्विट केदार दिघे यांनी करत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हिडिओएक्सवर पोस्ट करताना संताप व्यक्त केला आहे. केदार दिघे म्हणाले की, शुक्रवारी सकाळपासून आनंद दिघे यांच्या आश्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत अनेक लोकांनी मला फोन करून विचारले की, अशी कोणती प्रथा किंवा परंपरा आहे का, जिथे दिघेसाहेबांच्या आनंद आश्रमात पैसे उधळे जातात. ही खूप निंदनीय आणि दुःखद गोष्ट आहे.ज्या आनंद आश्रमात लोकांना न्याय दिला जात होता,त्या ठिकाणी असा प्रकार घडणे निंदनीय आहे. आता आनंद आश्रम.. आधीसारखा राहिलेला नाहीये. तर आपला आनंद हरपला आहे,अशी टीका केदार दिघे यांनी केली आहे.