IMG-LOGO
नाशिक शहर

प्रशिक्षण हीच भारतीय सैन्याची खरी शक्ती : सुप्रिया चित्रे

Tuesday, May 14
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यानात ते 'युद्ध आणि योद्धा' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. १४  : कोणत्याही सैनिकांची खरी ताकद ही त्याच्याकडील उपकरणांवर नव्हे तर त्याची महत्वाकांक्षा, साहस, मनोधैर्य, देशभक्ती यासारख्या भावनांवर अवलंबून असते. त्यांना आपल्या रेजिमेंटमधून मिळणाऱ्या प्रशिक्षणातूनच हे बळ मिळत असते. असे प्रतिपादन निवृत्त स्क्वॉड्रन लिडर सुप्रिया चित्रे व लेफ्टनंट कर्नल गणेश एलिस यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यानात ते 'युद्ध आणि योद्धा' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. पंडितराव खैरे यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. योगेश खैरे व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. एलीस हे बालपणी वसंत व्याख्यानमालाचे श्रोता होते. यातील व्याख्यानांतून प्रेरणा घेऊन भारतीय सैन्यात यश मिळविल्यानंतर आज ते वक्ता म्हणुन सहभागी झाले. त्याबद्दल श्री. एलीस यांच्यासह त्यांच्या आई-वडिल व पत्नीचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रत्येक देशाने युद्धासाठी सज्ज असावे : एलीसश्री. एलीस म्हणाले की, युद्ध म्हणजे काय याबाबत बोलताना त्यांनी सम्राट अशोक आणि महाभारतात युध्द टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी केलेल्या प्रयत्नांची उदाहरणे दिली. देशाच्या रक्षणासाठी युध्द अटळ असते. त्यामुळे प्रत्येक देशाने युद्धासाठी सदैव सज्ज असले पाहिजे. 1965 च्या भारत-पाकिस्तान युध्दातील घडामोडींवरही त्यांनी चीत्रफीतीच्या आणि उदाहरणांच्या माध्यमातुन प्रकाशझोत टाकला. अब्दुल हमीद, कैप्टण विक्रम बत्रा, मनोज पांडेय यांच्या शौर्याच्या गाथा त्यांनी सांगितल्या. आपल्या देशात सैनिकांना मिळणारे प्रशिक्षण हेच त्यांचे सर्वांत मोठे बळ आहे, हे प्रशिक्षण त्यांना प्रत्येक स्तरावर दिले जाते. महाराष्ट्र ही विरांची भूमी आहे. त्यामुळे मराठी तरूणांनी करियरसाठी भारतीय सैन्यात अधिकारी पदावर जाण्याचा अवश्य विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक आई ही योद्धाच : चित्रेश्रीमती चित्रे म्हणाल्या की, जो इतरांच्या भल्यासाठी लढतो तो खरा योद्धा. राष्ट्रमाता जिजाऊ प्रत्यक्ष युद्ध लढल्या नाहीत. पण त्यांनी योद्धा घडविला. त्यामूळे प्रत्येक आई ही योद्धा असते. या अनुषंगाने त्यांनी अगदी सोप्या भाषेत काही गोष्टींच्या माध्यमातुन संवाद साधला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणारं बळ हीच सैनिकांची आयुष्यभराची शक्ती असते. सैनिकांचे संपुर्ण जीवन खडतर असते. वयाच्या 16/17 व्या वर्षापासूनच त्यांना हा संघर्ष शीकावा लागतो. अधिकारी पदावरसुद्धा सैन्याची काळजी घ्यावी लागते. तोसुद्धा प्रशिक्षणाचा एक भाग असतो. कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा यामध्ये शिकवल्या जातात, याचीही काही उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. यशाला वेतनाचे निकष लावणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्याला तरूणांनीच विरोध केला पाहिजे. कारण यशाला कुठलाच शॉर्टकट नाही, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. अग्निविरच्या यशाबाबतही त्यांनी थोडक्यात विचार मांडले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नंदकुमार देशपांडे यांच्या सरगम म्युझिक अकॅडमीतर्फे सुधीर फडके ते श्रीधर फडके हा सुप्रसिद्ध मराठी गाण्यांचा कार्यक्रम कार्यक्रम झाला. 

Share: