All News

खा. डॉ. विखेंचा पोलिसांनी घेतला जबाब

खा. डॉ. विखेंचा पोलिसांनी घेतला जबाब

  • उच्च न्यायालयातील पोलिसांच्या अहवालाची उत्सुकता

नगर, दि. ३ मे  : रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शिर्डी विमानतळावर आलेल्या विमानांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची तपासणी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांचा याबाबतचा अहवाल औरंगाबाद खंडपीठात काय सादर होतो, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी खा. डॉ. सुजय विखे यांचा जबाब पोलिसांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे सोमवारी (3 मे) या प्रकरणी खंडपीठात होणार्‍या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


काही दिवसांपूर्वी विखे यांनी विमानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्यांनी इंजेक्शन घेऊन आलोय व सर्वसामान्यांनाही देणार असल्याचे म्हटले होते. इंजेक्शनचा तुटवडा भासत असताना विखे यांना हे इंजेक्शन्स कसे मिळाले, यावर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात खंड़पीठात काही जणांनी धाव घेतली आहे. ही इंजेक्शन्स नेमकी कुणाला व किती वाटली, तसेच विखेंना ती कशी व कोठून मिळाली, या प्रकाराच्या चौकशीची मागणी त्यांनी न्यायालयामध्ये केली आहे. त्यानुसार न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी तसेच त्यांनी इंजेक्शन्स कुठून व कशी आणले आणि ती कोणाला दिली, याची चौकशी सुरू झाली आहे. त्या काळातील शिर्डी विमानतळावर आलेल्या विमानांतून काय आले, याचेही सीसीटीव्ही फुटेज जप्त करून जतन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 


जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह पथकाने शिर्डी विमानतळावर जाऊन तेथे चौकशी केली व शिर्डी विमानतळ येथे असणारे 10 एप्रिल ते 25 एप्रिल 2021 दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तेथील काहींचे याबाबत जबाबही घेतले आहेत व खा. विखे यांचाही जबाब घेतला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता सोमवारी खंडपीठात होणार्‍या या प्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी पोलिस काय अहवाल देतात, तसेच याचिकाकर्ते आणि डॉ. विखे काय बाजू मांडतात, याची उत्सुकता आहे. 


खा. विखेंचे लाभार्थी कोण?

खा. डॉ. विखेंनी आणलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला आहे. खासदार विखे यांनी आणलेली दहा हजार रेमडेसिव्हिरची इंजेक्शन्स आणि सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांचा ’विकास’ यामध्ये एकच साम्य आहे व ते म्हणजे दोन्हीचे लाभार्थी अजून कुणालाच दिसले नाहीत, असे उपरोधिक भाष्यही त्यांनी यावर केले आहे. तसेच आ. रोहित पवार यांनीही याबाबत मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता खंडपीठात दाखल असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळातूनही उत्सुकता व्यक्त होत आहे.

Advertisement

IBPS test 4 IBPS MahaExam