All News

खतांच्या किंमती वाढण्यास केंद्र जबाबदार : पवार

खतांच्या किंमती वाढण्यास केंद्र जबाबदार : पवार

बारामती, दि. १५   मे :  खतांच्या किमती वाढायला केंद्र सरकार जबाबदार आहे. स्फुरद आणि पालाशच्या किमती वाढल्याने युरियाकडे वळू नये. केंद्र सरकारला आमचे आवाहन आहे, की खतांच्या किमती कमी कराव्यात. शेतकर्‍यांनी इतर प्रकारची खाते वापरावी, असे आवाहन शेतकर्‍यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती येथील बैठकीनंतर विद्या प्रतिष्ठानच्या आवारात पवार यांनी पत्रकारांशी साधला. या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ’’बारामतीत व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या अधिक आहे. तीच परिस्थिती पुणे, पिंपरी चिंचवड ग्रामीणमध्ये आहे. परिस्थिती बर्‍याच अंशी बदलत आहे; मात्र कोरोना नियमावलीचे सर्वांनी भान ठेवणे आवश्यक आहे, तरच कोरोना आटोक्यात आणण्यात यश येईल. रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेवढा मधल्या काळात जेवढा रेमडेसिव्हिरचा तुटवडा होता, तेवढा आता जाणवत नाही. जेवढी लस पाहिजे, तेवढ्या प्रमाणात आपल्याला लस मिळत नाही. ’भारत बायोटेक’ला जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यांची लस सुरू होईल. एकदा लस मोठया प्रमाणात उपलब्ध झाली, की मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करता येईल.’’

आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत, त्याची चौकशी सुरू आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. पुढच्या चार-पाच दिवसांत  दिवसांत महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे, अशा वेळी आवश्यक काळजी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

म्युकर मायकोसिस हा आजारपूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने आढळला नव्हता. आज प्रांताधिकार्‍यांना याबाबत खासगी डॉक्टरांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातील इंजेक्शनचा तुटवडा आहे. मुंबईला गेल्यावर याबाबत सचिवांसह इतरांबरोबर बैठक घेण्यात येईल. त्यानंतर आवश्यक पुरवठा सुरळीत करण्यात येईल. यावरील उपचाराचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भाव केला असल्याचे पवार म्हणाले.

Advertisement

test2 IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd