All News

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

शिर्डी, दि. ९  मे :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.


राहाता व शिर्डी परिसरातील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खा.सदाशिव लोखंडे, आ.सुधीर तांबे, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के,साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षीका डॉ.मैथील पितांबरे यावेळी उपस्थित होते.


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी ऑक्सिजन प्लँट उभारणी, आरटीपीसीआर लॅब उभारणी, कोविड उपचारांसाठी बेडची संख्या वाढविणे, रुग्णांना औषधोपचार व औषधांचा पुरवठा तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. साईसंस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटर येथे कार्यरत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णांची मानवतेच्यादृष्टीने सेवा करावी अशी सूचना मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कोविडबाधित रुग्णांवर योग्य उपचार करावा अशी सूचना केली. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्याने वागावे असे सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. बैठकीला तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, साईसंस्थान हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


ऑक्सिजन निर्मिती युनिट आणि कोविड केअर सेंटरची मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहाणी

शिर्डी येथे सुमारे चार हजार दोनशे बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. मुख्यमंत्रीमहोदयांच्या मान्यतेने तसेच खा.सदाशिव लोखंडे यांच्या पुढाकाराने संस्थानच्या जंबो कोविड सेंटरला मान्यता देण्यात येत असून लहान मुलांवरील उपचारांसाठी त्यामुळे मोठी सुविधा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोविड उपचाराच्या मुंबई मॉडेलची प्रशंसा केली असून, त्याच धर्तीवर शिर्डी येथे उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. साईसंस्थानतर्फे उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लॅंटला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी त्यांनी यावेळी केली. कोविड रुग्णांच्या चाचणी अहवालाची तपासणी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर प्रयोगशाळेची पाहणी करुन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना मंत्रीमहोदयांनी अधिकाऱ्यांना केली. कोरोनाची तीसरी लाट लक्षात घेऊन सर्व जिल्हयात ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्याबरोबरच बेडची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लसीकरणासाठी आवश्यक लसींचा अपुरा पुरवठा केंद्र सरकारकडून होत आहे. लसीकरणासाठी राज्याची यंत्रणा कार्यक्षम असून पुरेशा लसींचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

test 4 IBPS IBPS test2