All News

लक्ष्मण रेषा ओलांडल्याचे परिणाम कोरोनाने दाखविले

लक्ष्मण रेषा ओलांडल्याचे परिणाम कोरोनाने दाखविले

  • मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा; निसर्गाचे संवर्धन करून विकास आवश्यक

मुंबई, दि. २२  मे : निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पाहातो आणि आपल्याला जपतो आहे; पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते, हे कोरोना विषाणूने दाखवून दिले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. या वेळी त्यांनी विकासकामे करताना निसर्गाची काळजी कशी घेता येईल, निसर्गाचे संवर्धन कसे करता येईल हे सांगणारी आणि यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी संस्था स्थापन करा, अशी सूचना दिली. विशेष म्हणजे या संस्थेचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागली. माझ्या मते संजीवनी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी, आपण ती जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास करत चाललो आहोत. त्यामुळेच जंगलाचा र्‍हास करून विकासकामांचे प्रस्ताव जेव्हा आपल्यासमोर येतात, तेव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे, असे नाही तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे, असे ते म्हणाले. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, या वर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो; पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

जैवविविधतेत नष्ट होणार्‍या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये, तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


निसर्गासोबत सुयोग्य वर्तन हवे

आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे ते या क्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ’आरे’चे जंगल आपण वाचवले. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले ’आरे’चे क्षेत्र आपण जपले. जगात अशाप्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेल असेही ते म्हणाले. निसर्गासोबत जगण्यासाठी सुयोग्य वर्तन (प्रोपियेट बिहेविअर) विकसित करायला हवे. असे झाले, तरच आरोग्यदायी विकास होईल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Advertisement

test2 MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd