All News

इलेक्ट्रिक बस बेस्टचे क्रांतिकारक पाऊल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इलेक्ट्रिक बस बेस्टचे क्रांतिकारक पाऊल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि ७, ऑगस्ट  : कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

बेस्टच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण, FAME II प्रकल्पातंर्गत 12 मीटर्स लांबीच्या इलेक्ट्रीक बसगाड्या, नवीन वातानुकुलीत बस मार्ग क्र.ए-115 आणि ए-116 तसेच 24 इतर गाड्याचे लोकार्पण श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माहिम पश्चिम बसस्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी.बेलारूस, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, आमदार सदा सरवणकर, नगरसेवक मिलींद वैद्य, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सन 1874 ते 2021 हा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. वेळेनुसार बेस्टमध्ये बदल होत गेला. इलेक्ट्रीक बस प्रदूषण न करणारी व पर्यावरण पूरक बस आहेत. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. आम्ही वचननाम्यात म्हटल्याप्रमाने बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे, असे नियोजन करण्यात येत आहे.

कोरोनाकाळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त झाले. काहींचे मृत्यू झाले तरीदेखील बेस्ट थांबली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे बेस्टचे आधुनिकीकरण शक्य होत आहे. यापुढे ई पास सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असून एकाच तिकीटावर अनेक सुविधा मिळणार आहेत.

गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलते आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करतो आहोत. कालच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालक भेटून गेले. त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी, अशी विनंती केली. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे. कोरोना उलटणार तर नाही ना हेही पहावे लागणार आहे. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी इलेक्ट्रीक बसच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली. नवीन इलेक्ट्रनिक धोरणानुसार 15 टक्के इलेक्ट्रॉनिक व्हेइकल वाढवण्यात येणार आहेत. मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थापनाविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक ॲप विकसित करण्यात येणार आहे, असेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.


सेवानिवृत्त एक हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या उपदानाचे प्रदान

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान वितरणाचा शुभारंभ श्री.ठाकरे यांच्या हस्ते झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात उपदानाची रक्कम थेट जमा होणार आहे. 1005 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी लागणारी रुपये 94.21 कोटी एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

Advertisement

IBPS test2 MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd