All News

’त्या’ महिलेकडील मोबाईलमध्ये अनेकांचे चित्रीकरण?

’त्या’ महिलेकडील मोबाईलमध्ये अनेकांचे चित्रीकरण?

  • ’हनीट्रॅप’मध्ये आणखी एकाला अटक; महिलेकडील व्हिडिओचा शोध सुरू

नगर, दि. २१ मे :  जखणगाव येथील ’हनीट्रॅप’मध्ये असलेल्या संबंधित महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असून, या ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. काही बँकेची कागदपत्रेसुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहेत. तिच्याकडे असलेल्या मोबाईलवरून तिने आतापर्यंत कोणाकोणाला कशा पद्धतीने संपर्क केला तसेच तिच्याकडे कोणाकोणाचे व्हिडिओ आहे, याचा पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे. संबंधित महिलेकडे दोन मोबाईल असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, ते दोन्ही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दरम्यान, ’हनीट्रॅप’मध्ये पोलिसांनी गुरुवारी हिंगणगाव येथील बापू सोनवणे याला अटक केली आहे.

जखणगाव ’हनीट्रॅप’ व त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याच्या प्रकाराचे गूढ दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. या प्रकारात अनेक नामवंत मंडळी अडकली असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्यांना पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे’ पण अजूनही त्यांचे तसे धाडस होत नाही; मात्र आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवताना त्या महिलेकडे असलेले व्हिडिओ तसेच अन्य आरोपींद्वारे कोणाकोणाला यासाठी संपर्क केले जात होते, याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे तक्रार देण्यासाठी जरी कोणी पुढे आले नाही, तरी पोलिस मात्र जबाब घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहण्याची शक्यता आहे.

’हनीट्रॅप’ प्रकरणामध्ये यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता बापू सोनवणे (राहणार हिंगणगाव) याला अटक करण्यात आली आहे. बापू हा व्यावसायिक असून, त्याने त्या महिलेची साथ घेऊन इतरांना फसविण्याचा प्रकार केला आहे, हे तपासामध्ये उघड झाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी बापूला त्याच्या घरातून अटक केली आहे. तसेच त्याची चार चाकी आलिशान गाडीसुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.


सोनवणेवर अनेक गुन्हे

’हनीट्रॅप’मध्ये अटक केलेल्या सोनवणेवर नगर शहरातील कोतवाली, पारनेर यासह विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आता त्याचे कोण-कोण साथीदर आहेत, याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढत जाणार आहे. तसेच ’हनीट्रॅप’ प्रकरणात ज्या महिलेला अटक केली आहे, तिच्याकडूनही वेगवेगळ्या प्रकारची माहिती आता पुढे येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क केला तर अधिक सोयीचे होऊन या प्रकरणाचा तपाससुद्धा चांगला होईल. पोलिस आता पहिल्या एक कोटी खंडणीच्या गुन्ह्यासह दुसर्‍या तीन कोटी रुपये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कोण कोण सामील आहे, याचा शोध घेत असल्याचे नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

Advertisement

MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4