All News

राजकीय विरोध केला, तर प्रकरणे काढली जातात बाहेर

राजकीय विरोध केला, तर प्रकरणे काढली जातात बाहेर

  • पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर आरोप; राजकारणासाठी चाैकशा

मुंबई, दि.  4 जुलै : भाजपच्या काळात राजकीय वातावरण तापले की प्रकरणे बाहेर काढली जातात; पण ही प्रकरणे दाबली जातात की आणखी काय होते ते कळत नाही. सर्व प्रकरणे तात्पुरती बाहेर काढली जातात. राजकीय वापरासाठी चौकशा केल्या जातात, असे सांगतानाच पाच वर्षांत तुम्ही काय दिवे लावले, हे चंद्रकांत पाटील यांनी सांगावे, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

केंद्र सरकारच्या संस्था या स्वायत्त संस्था आहे; मात्र तरीही या संस्थांचा वापर केला जात आहे. सीबीआयकडे एक हजार खटले प्रलंबित आहेत, असे सांगतानाच सत्ता गेल्यावरच भाजपला सर्व प्रकरणे आठवू लागतात, असा चिमटा चव्हाण यांनी काढला. ते म्हणाले, की नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी कोरोना नसतानाही त्यांनी कितीवेळा अधिवेशने घेतली, याची भाजपने माहिती घ्यावी. त्यानंतरच बोलावे. कोरोना संकटाच्या काळात विरोधकांनी अधिवेशनाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच येणाऱ्या अधिवेशनात सरकारकडून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपला निवडणुका जिंकून सत्ता मिळवता येत नाही तर तोडफोड करून सत्ता मिळवता येते, हे जग जाहीर झाले आहे. देशातील नागरिकांचे कोरोना काळात मोदी सरकारने हाल केले. हे सर्व पुसून टाकण्यासाठी राज्यांतील सरकार पडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप करतानाच महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. येणाऱ्या निवडणुकीत आघाडीला चांगले यश मिळेल आणि भाजप राज्यातून संपेल, असा दावाही त्यांनी केला.

चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर थेट भाष्य केले नाही. विधासभेचे अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळणार हे निश्चित आहे. फक्त उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवेल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आता ही निवडणूक 6 तारखेला होणार की कधी हे सांगणं अवघड आहे, असे ते म्हणाले.


विरोधकांना रोखण्यासाठी अध्यक्ष नसतो

विधानसभा अध्यक्षपदासाठी तुमचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेनेही तुमच्या नावाला संमती दर्शवली आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे, असे चव्हाण यांना विचारण्यात आले. त्या वेळी विधानसभा अध्यक्षाचे काम सभागृहाच्या कामकाजाला न्याय द्यायचे असते. विरोधकांना रोखण्यासाठी अध्यक्ष नसतो. अध्यक्ष कोणत्याही एका पक्षाचा नसतो. तो सभागृहाचा अध्यक्ष असतो, असे सांगतानाच अध्यक्षपद हे महत्त्वाचे आहे. ते काँग्रेसला मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

IBPS IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd