All News

रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा

रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा

  • रुग्णांसह प्रशासनही चिंतेत;अधिकृत बील असेल तरच इंजेक्शन स्वीकारणार

नगर, दि.२७ एप्रिल : जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा पुन्हा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजनचा साठा केवळ चार दिवस पुरेल इतकाच आहे. यामुळे रुग्णांसह प्रशासनही चिंतेत आहे. प्रशासनासमोर रुग्णालयांच्या मागणीनुसार इंजेक्शनची उपलब्धता करण्याचे व दुसरीकडे आणखी ऑक्सिजन मिळवण्याचे आव्हान उभे आहे. तशात रुग्णालयांनी आता रुग्णांच्या नातेवाइकांनी परस्पर आणलेल्या इंजेक्शनचे अधिकृत बील असेल तरच ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ओळखीपाळखीतून वा बाहेरगावाहून इंजेक्शन आणण्याचा मार्गही खुंटला आहे. दरम्यान, प्रशासनाने आता प्रांताधिकारी स्तरावर इंजेक्शन्स वाटप व नियोजनाचे अधिकार दिले आहेत. 


जिल्ह्यामध्ये रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन्सचे नियोजन कशा पद्धतीने करायचे याचा आराखडा प्रशासन करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित इंजेक्शन्स हे रुग्णालयांना पुरवण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना नियुक्त केले असून त्याबाबतचे आदेश दिले आहे. जिल्ह्यासाठी दररोज येणारा साठा अत्यंत तुटपुंजा असल्यामुळे पुन्हा इंजेक्शन्ससाठी धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यामध्ये इंजेक्शन्सचा साठा कमी प्रमाणात असल्यामुळे ते कोणा-कोणाला व कसे पुरवायचे असा प्रश्‍न आता निर्माण झालेला असतानाच दुसरीकडे ऑक्सिजनचा पुरवठाही म्हणावा असा नाही. चार दिवस पुरेल एवढाच साठा नगर जिल्ह्यामध्ये सध्या आहे. दोन दिवसापूर्वी नाशिक येथून दोन टँकर नगर येथे आले होते. त्यामुळे नगर जिल्ह्याला आता चार दिवस पुरेल एवढा साठा आहे. 


नगर जिल्ह्याला 14 एप्रिलपासून अवघी आठ हजार 343 इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध झाला आहे. दुसरीकडे नगर शहरामध्ये रुग्ण संख्याही वाढत चालली आहे. विशेष म्हणजे तालुका स्तरावर असणारे रुग्ण नगर शहरामध्ये येऊ लागले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आता जागाच शिल्लक राहिली नाही, तर खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा तशा प्रकारची अवस्था पुन्हा पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यासाठी जे इंजेक्शन्स येते आहे, त्याचे नियोजन करण्यासाठी आता प्रशासनाने निर्णय घेतला असून प्रांताधिकार्‍यांना आता त्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. जे इंजेक्शन्स तालुक्याला पुरविले जातील, ते संबंधित रुग्णालयांमध्ये देण्याची जबाबदारी आता निश्‍चित करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.


अवघी 537 इंजेक्शन्स

प्रशासनाकडे इंजेक्शन्सचा पुरवठा जसा होईल, त्यानुसार तो संबंधित तालुक्यांना देण्यात येतो. त्यासाठी आता प्रांताधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मंगळवारी 537 इंजेक्शन्स प्राप्त झाली व त्याचे वितरण त्या-त्या तालुक्यात करण्यात आले आहे. शहरी भागांमध्येसुद्धा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे तिथे आता इंजेक्शन पुरवण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांनी सांगितले. रुग्णांच्या नातेवाइकांकडे इंजेक्शन देत नसून थेट रुग्णालयात देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd test 4 test2