All News

उद्योग मित्र दिग्विजय कपाडिया

उद्योग मित्र दिग्विजय कपाडिया

नाशिकातील ज्येष्ठ उद्योजक दिग्विजय कपाडिया यांचे आज  निधन झाले. दिग्विजय कपाडिया यांना उद्योग व्यवसायाचा वारसा आपल्या वडिलांकडूनच लाभला होता. व्यवसायात  ते आपल्या वडिलांना तर सामाजिक कार्यात  बाबुभाई राठीना ते आपला गुरू मानीत. कपडा व्यवसाय हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. गोखले एजुकेशन सोसायटीतून मधून पदवीधर झालेले दिग्विजयजी प्राचार्य गोसावी सरांचे प्रिय विद्यार्थी होते .आयुष्यभर त्यांचे गोसावी सरांशी उत्तम संबंध होते. गोखले एज्युकेशनच्या सोसायटीच्या सर्व कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी होत. दिग्विजयजींनी आयुष्यभर उद्योग  व व्यापार फार उत्तमरित्या केला .देशभरात अनेक ठिकाणी त्यांचे युनिट आहेत. पासपोर्ट प्रिंटिंग, करन्सी नोट ला प्रिंटिंग करता लागणारे सामान पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय होता .प्रिंटिंग ला लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री त्यांच्याकडे होती. प्रवासाची त्यांना प्रचंड आवड होती. उमेदीच्या काळात त्यांनी जगभर प्रवास करून आपला उद्योग व्यवसाय उभा केला. त्यांची सामाजिक बांधिलकी फार उत्तम होती. अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीत त्यांचे  महत्त्वपूर्ण योगदान होते. कपडा व्यवसायिकांची संघटनेत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. या संघटनेच्या अखिल भारतीय बॉडीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले .महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ते 2010 ला अध्यक्ष होते. व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता त्यांनी आयुष्यभर महाराष्ट्रभर प्रवास केला. प्रश्न समजून घेतले व त्यांची सोडवणूक करण्याकरता मनापासून प्रयत्न केले. त्यांना कोणीही काहीही काम सांगितले म्हणजे ते शंभर टक्के त्याला मदत करीत असत. अनेक लोक विश्वासाने त्यांना व्यवसाया विषयी, घरगुती प्रश्नांविषयी सल्ला विचारीत. अतिशय उत्तम वक्ते असलेले दिग्विजय कपाडिया उमद्या व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.

त्यांना चहा फार आवडत असे. जवळजवळ दर तासाला ते चहा पीत .चहा सोडला तर त्यांना  कोणतेही व्यसन नव्हते . दिग्विजयजी पूर्णपणे शाकाहारी होते. सामाजिक जीवनात जरी ते कार्यरत असलेल तरी  रात्री नऊ नंतर कधीही ते कोणत्याही समारंभात थांबत नसत .रविवारी कितीही महत्वाचे काम असले तरी ते टाळत व पूर्ण वेळ कुटुंबासाठी देत. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ,समाजकारण, उद्योग व्यवसाय, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सरकारी अधिकाऱ्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते .एकदा माणूस जोडला की ते आयुष्यभर त्याला जोडून ठेवत. अतिशय मधाळ वाणी ,हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेले दिग्विजयभाई मेन रोड च्या कपडा दुकानावर टाय लावून बसणारे नाशिक मधले कदाचित ते पहिले व्यापारी असतील .आपल्या मित्रांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमाला ते सहभागी होत. सुख-दुःखात सामील होत. त्यांचा मुलगा विक्रम  आता त्यांच्या उद्योग व्यवसायात चांगला स्थिरावला आहे .मुलगी तिच्या संसारात  स्थिरावली आहे .मागील वर्षी त्यांची 75 वी साजरी झाली होती .अजूनही त्यांना उत्तम आयुष्य लाभेल असे वाटत होते . थोड्याशा आजारपणाने देवाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले .माझे आणि त्यांचे गेली अनेक वर्ष उत्तम ऋणानुबंध होते .त्यांच्या जाण्याने माझी फार मोठी वैयक्तिक हानी झाली आहे. नाशिक मधील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांच्या उद्योगधंद्यांच्या समस्या  करता लढणारा उद्योग मित्र आपण गमावला आहे.

-प्राचार्य प्रशांत पाटील


Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2