All News

कोरोनामुक्त नागरिकांचे एक जूनपासून सर्वेक्षण

कोरोनामुक्त नागरिकांचे एक जूनपासून सर्वेक्षण

पुणे, दि. २६ मे : पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्ण संख्येतील घट देखील कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे; मात्र याचदरम्यान म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून कोरोनामुक्त झालेल्या सर्व रुग्णांना महापालिकेकडून फोन करून, त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची कोणती लक्षणे आहेत का? महापालिकेच्या वॉर रूममधून या रुग्णांशी संपर्क साधून या आजाराची कोणती लक्षणे आहेत का? याची विचारणा करत आहेत. या आजारासंबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांना, महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात बोलावून कान, नाक, घसा व नेत्र यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील ’म्युकरमायकोसिस’ आजाराचा वाढता धोका ओळखून आता एक जूनपासून कोरोनामुक्त नागरिकांचे घरोघरी जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

आजपर्यंत या आजाराने शहरात 19 जणांचा मृत्यू झाला असून आणखी मृत्यू रोखणे व रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी महापालिकेने ही शोधमोहीम सुरू केली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत महापालिकेने दोन हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांशी संपर्क साधून या आजाराविषयीच्या लक्षणांची विचारपूस केली आहे; मात्र यामध्ये ही लक्षणे असलेल्यांचे प्रमाण नगण्य असल्याचे सध्यातरी आढळून आले आहे. याबाबत आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, की म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी ससून व दळवी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन खरेदीसाठी स्थायी समितीमार्फत निविदा काढली जात आहे. जिल्हाधिकार्‍यांकडेही या इंजेक्शन पुरवठ्याबाबत महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam test2 IBPS