IMG-LOGO
क्रीडा

IPL 2024 : लखनौ संघाचा पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय; मयंक यादवने सामना फिरविला

Sunday, Mar 31
IMG

मयंकने त्याच्या ३ विकेटसह यंदाच्या आयपीएलमधील १५५.८ किमी प्रति तास वेग असलेला सर्वात वेगवान चेंडू टाकला.

लखनौ, दि. ३१ : लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ संघाचा मयंक यादवच्या भेदक आणि वेगवान गोलंदाजीच्या जोरावर संघाने पंजाब किंग्सकडून विजय हिसकावून घेतला. त्यांनी पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय मिळवला. एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला चांगल्या सुरुवातीनंतर २० षटकांत ५ गडी गमावून केवळ १७८ धावाच करता आल्या.शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची मोठी भागीदारी केली. शिखर धवनने ५० चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर ७० धावा केल्या. तर बेयरस्टो ३ चौकार आणि ३ षटकार लगावत २९ चेंडूत ४२ धावा करत बाद झाला. मयंक यादवने ही भागीदारी तोडली. मयंकने १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मयंक यादवने आपला पदार्पण सामना खेळताना शानदार गोलंदाजी करत एलएसजीला सामन्यात परत आणले. मयंकने त्याच्या ३ विकेटसह यंदाच्या आयपीएलमधील १५५.८ किमी प्रति तास वेग असलेला सर्वात वेगवान चेंडू टाकला. 

Share: