IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

loksabha Election 2024 : काँग्रेसबरोबर नकली शिवसेना; नरेंद्र मोदी यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Tuesday, Apr 09
IMG

राज्यात जनादेश झुगारून इंडिया आघाडीवाले महाराष्ट्रात सत्तेत आले तेव्हा राज्यांपेक्षा स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार केला.

चंद्रपूर, दि. ९ : राज्यात काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली आहे व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली.मोदींनी चंद्रपुरात आज काँग्रेसला कारल्याची उपमा दिली. त्यासाठी त्यांनी मराठीतली म्हणही सर्वांना बोलून दाखवली.  मोदींनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे सरकार राज्याचे हिताचे काम करत आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मोरवा येथे पंतप्रधानांची सोमवारी सभा झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अन्य नेते उपस्थित होते. अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान झाले. अस्थिरता विरुद्ध स्थैर्याची ही लढाई आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. स्थिर सरकारचे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेपेक्षा कुणालाच अधिक माहीत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती  तेव्हा त्यांनी अनेक योजना बंद केल्या, असा आरोप मोदी यांनी केला. जेव्हा राज्यात जनादेश झुगारून इंडिया आघाडीवाले महाराष्ट्रात सत्तेत आले तेव्हा राज्यांपेक्षा स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार केला. असे त्यांनी नमूद केले. 

Share: