गोव्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
पणजी, दि. १४ मे : कोरोना दुसर्या लाटेत गोव्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरले. गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत या रुग्णालयात 74 रुग्णांनी जीव गमावला आहे. मंगळवारी 26, बुधवारी 20, गुरुवारी 15 आणि शुक्रवारी 13 रुग्णांचा जीव गेला आहे. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठ्यावरुन सुरू असलेल्या या गोंधळाप्रकरणी समिती नेमली आहे. तीन सदस्यीय समिती चौकशी करणार असून तीन दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे.गोव्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात सर्वाधिक पॉझिटीव्हिटी रेट हा गोव्यात आहे. गुरुवारी रुग्ण वाढीचा दर 48.1 टक्के इतका होता. गेल्या 24 तासांत गोव्यात दोन हजार 491 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.