शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
मुंबई, दि. २६ : विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढण्यावर अडून असल्यामुळे शिवसेनेकडून कारणे दाखवा नोटीस बजाबण्यात येणार आहे. अजित पवार गट महायुतीत असताना विजय शिवतारे सातत्याने त्यांच्यावर आरोप करत आहेत, शिवाय पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा नसताना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे येत्या २४ तासात उत्तर द्यावं, अशी नोटीस शिवतारे यांना बजावण्यात आली आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंशी चर्चा केली. पण यानंतरही आपल्या निर्णयापासून त्यांनी माघार घेतलेली नाही. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नणंद आणि भावजय यांच्यामध्ये ही निवडणूक होणार आहे. मात्र दोन्ही पवारांना धुळ चारण्यासाठी महायुतीतल्या शिंदे गटाच्या विजय शिवतारेंनी दंड थोपटले आहेत. महायुतीमधल्याच मित्रांनी आव्हान दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीमध्येच कोंडी झाली आहे. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. शिवतारे सातत्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. आम्हीसुद्धा अरे ला कारे करु शकतो, मात्र आम्हाला वातावरण खराब करायचं नाही अशा शब्दांत अजित पवारांनी विजय शिवतारेंना सुनावल आहे. विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कुणाची असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केले आहे.