शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला हमीभाव मिळावा, अशी आमची अपेक्षा होती. सरकार यासाठी काहीतरी करेल असं वाटत होतं.
नवी दिल्ली, दि. २४ : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (२३ जुलै) लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर आता लोकसभा व राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील खासदार अर्थसंकल्पावरील आपापली मतं मांडत आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला हमीभाव मिळावा, अशी आमची अपेक्षा होती. सरकार यासाठी काहीतरी करेल असं वाटत होतं. मात्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांचा विचार केला आहे. ज्यांच्या जीवावर मोदींचं सरकार टिकून आहे त्यांची काळजी घेतली गेली आहे. देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. मात्र, त्यावरही सरकारने कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. उत्तर प्रदेश राज्याला काहीच मिळालेलं नाही. डबल इंजिन सरकारचा आमच्या राज्याला काहीतरी फायदा होईल असं वाटत होतं. परंतु, सरकारने केवळ इतर राज्यांच्या (बिहार व आंध्र प्रदेश वगळता) तोंडाला पानं पुसली आहेत.