प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल, परीक्षा विविध भाषांमधून घेतल्या जातील आणि सामायिक पात्रता परीक्षेतील पात्रता तीन वर्षासाठी वैध असेल.
नवी दिल्ली, २० ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ बैठकीतल्या राष्ट्रीय भरती यंत्रणेच्या निर्णयाला मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. भारतातील युवावर्गासाठी आजचा दिवस म्हणजे मैलाचा दगड असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले, या अभुतपुर्व निर्णयामुळे केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी नानाविध परीक्षा देण्याचा अडथळा सामायिक पात्रता परीक्षेमुळे टाळता येईल. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, समाजातील सर्व घटकांना राष्ट्रीय भरती यंत्रणा समान संधी देईल.प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल, परीक्षा विविध भाषांमधून घेतल्या जातील आणि सामायिक पात्रता परीक्षेतील पात्रता तीन वर्षासाठी वैध असेल. विद्यार्थ्यांवरील आर्थिक ओझेही या सामायिक परीक्षेमुळे टाळता येईल, हा उमेदवारांचा मोठाच लाभ आहे. अमित शहा म्हणाले, राष्ट्रीय भरती यंत्रणा ही भरती प्रक्रियेत एकसंध परिवर्तन घडवून आणत असल्यामुळे मोदी सरकारने उचललेले हे अभूतपूर्व पाऊल आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणून देशभरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा रास्त हक्क मिळवून दिला आहे.