मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम करत आहे. देशभरात भाजपाची दहशत निर्माण केली जात आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या घटनेचा परिणाम निवडणुकीवर होईल.
मुंबई, दि. २२ : दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेनंतर खासदार शरद पवार यांनी सत्ताधार्यांवर निशाना साधला आहे. आतापर्यंत देशात काही अपवाद वगळता निवडणुका अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये झालेल्या आहेत. मोदी सरकार आल्यानंतर यावेळची निवडणूक किती सुयोग्य वातावरणात होईल, मोकळ्या वातावरणात होईल याची शंका आम्हा सगळ्यांना आहे. त्याची काही कारणे आहेत. सरकार अलिकडे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या एजन्सींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज दाबण्यासाठी करत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले, मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम करत आहे. देशभरात भाजपाची दहशत निर्माण केली जात आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या घटनेचा परिणाम निवडणुकीवर होईल आणि आगामी निवडणुकीत केजरीवाल यांचे उमेदवार सर्व जागांवर जिंकतील. त्यांचे १०० उमेदवार निवडून येतील. दिल्लीच्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यांना एकही जागा मिळणार नाही. लोक पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या बाजूने कौल देतील. तसेच ज्यांनी या सर्व कारवाया केल्या त्यांच्या थोबाडीत लगावतील. असेही शरद पवारांनी नमूद केले.