शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी सुरू होती. यामुळे ही घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डेहराडून, दि. २४ एप्रिल : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन झाल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 384 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. 23 एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरू केले. सुखरुप बाहेर काढलेल्या लोकांना आर्मी कँपमध्ये ठेवण्यात आले आहे. यात सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी सुरू होती. यामुळे ही घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्वीटरवरून अलर्ट जारी केला होता. भारतीय लष्कराने बचावकार्य सुरू केले होते. आज रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. घटनास्थळाची पाहणी करुन अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर बचावकार्याला अजून वेग आला. आज मी हवाई पाहणी केली आहे. बचावकार्य सुरू आहे; मात्र रस्ता अजूनही बंद आहे.’, असे रावत यांनी सांगितले.